सासवड, २६ सप्टेंबर २०२३ : पुण्याच्या धायरीहून जेजुरी येथे देवदर्शनासाठी आलेल्या नवदांपत्याला घेऊन जाणारी रिक्षा सासवडजवळ विहीरीत पडल्याने नवदांपत्यासह एका तरुणीचा मृत्यू झाला. तर दोन जणांना वाचवण्यात पोलीसांना यश आले आहे. पुण्यातील धायरी येथून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या नव-विवाहितांची रिक्षा ही सासवड नजीक बोरगावकेमळा येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये पडली. यामध्ये या नवविवाहितांचा आणि त्यांच्याबरोबर आलेल्या एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. संसाराला सुरुवात होण्याअगोदरच या नवविवाहितांचा दुर्दैवी शेवट झाला.
सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर या नवविवाहितांचा आणि रिक्षातील असलेल्या इतर व्यक्तींचा त्यांच्या कुटुंबीयांसोबत असलेला संपर्क तुटला होता. आज सकाळी व्यायामाला जाणाऱ्या मुलांना विहिरीतून ‘वाचवा वाचवा’ असे कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता दोन व्यक्ती त्यांना त्या विहिरीत दिसल्या आणि यानंतर ही माहिती सासवड पोलीसांना देण्यात आली सासवड पोलिसांनी दोघांना सुखरूप बाहेर काढले, मात्र नवविवाहित जोडपं आणि एका तरुणीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर