निगडी येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या ‘सेतू’ केंद्रातील सर्व्हर गुरुवारी दिवसभर बंद (डाऊन) राहिल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. यामुळे आधारकार्ड दुरुस्ती, जात प्रमाणपत्रे, उत्पन्न, रहिवासी, निवासी दाखले आणि महत्त्वाचे ७/१२ उतारे यांसारखी अत्यावश्यक कामे खोळंबली. यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आलेल्या शेकडो नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
तांत्रिक बिघाडाचा फटका, वेळेचा अपव्यय
देहूरोड, चिखली, भोसरी, आकुर्डी, मावळ आणि पिंपरीसह विविध भागातून नागरिक कामे पूर्ण होतील या आशेने कार्यालयात आले होते. मात्र, सर्व्हर बंद असल्याने त्यांचे ऑनलाइन काम होऊ शकले नाही. “कामासाठी विनाकारण हेलपाटे मारावे लागले,” अशी तक्रार नागरिक रुचिता कुंभार यांनी केली. नागरिकांचे वेळ आणि श्रम दोन्ही वाया गेले. प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
प्रशासनाचे स्पष्टीकरण: ‘ERROR 404’
या तांत्रिक समस्येबद्दल अप्पर तहसील कार्यालयाचे महसूल सहायक सुधीर लिपारे यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांच्या मते, “हा राज्यपातळीवरील तांत्रिक बिघाड आहे आणि सर्व्हर चालू-बंद होत असतो. या तांत्रिक अडचणी कधी संपतील, हे निश्चित सांगता येत नाही.”
‘सेतू’ केंद्र हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे या अत्यावश्यक सेवा वारंवार ठप्प पडत आहेत. यामुळे नागरिकांचा मनस्ताप वाढला असून, प्रशासकीय कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि शासकीय सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे














































