दिवाळी (Diwali) हा दिव्यांचा सण! पण पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील अनेक भागांतील नागरिकांना या उत्सवातही महावितरणच्या (MSEDCL) अस्थिर आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे अंधारात राहण्याची वेळ आली आहे. वसुबारसपासून नरक चतुर्दशीपर्यंत चिखली (Chikhali), मोशी (Moshi), मोहननगर (Mohannagar) परिसरासह अनेक ठिकाणी अर्धा ते एक तास बत्ती गुल झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून, दिवाळीच्या उत्साहावर विरजण पडले आहे. महावितरणच्या या लहरीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चिंचवडच्या मोहनगर भागातील नागरिकांना तर अभ्यंगस्नानाच्या वेळीच पहाटे ५ ते सकाळी ७ या वेळेत वीज खंडित झाल्याचा कटू अनुभव आला. या भागात दररोज ही समस्या असल्याचे नागरिक सांगतात. चिखलीतील मोरेवस्ती, ताम्हाणे वस्ती आणि त्रिवेणीनगर येथील रहिवासीही हैराण आहेत. त्रिवेणीनगरमधील काही सोसायट्यांमध्ये दररोज सकाळी वीजपुरवठा खंडित होतो आणि हेल्पलाईनवर तक्रार केल्यावर अर्ध्या तासाने सुरू होतो, अशी माहिती स्थानिक नागरिक भाऊसाहेब थोरात यांनी दिली.
याशिवाय, मोशी गावठाण येथे दोन तास, तर डुडुळगाव येथे दीड तास वीजपुरवठा खंडित झाला होता. कुदळवाडी भागातील बालघरे वस्तीतही ही समस्या कायम असून, दोन ठिकाणांहून होणाऱ्या पुरवठ्यामुळे अचानक वीज गुल होते. पुरवठा सुरळीत राखण्याची मागणी संभाजी बालघरे यांनी केली आहे.
मामुर्डीतील साईनगरमध्येही ‘विजेचा लपंडाव’ नित्याचा झाल्याचे नागरिक सांगतात. सामाजिक कार्यकर्ते सचिन तळेकर यांनी “सोसायटीतील नागरिकांनी दिवाळी अंधारात करायची का?” असा संतप्त सवाल करत दर दोन तासाला वीज गुल होत असल्याची आणि महावितरणकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याची तक्रार केली आहे. वडमुखवाडी येथील वैभव तापकीर यांनी तर हेल्पलाईन क्रमांक कायम व्यस्त असल्याचे सांगितले.
यावर, महावितरणचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी, मोरे वस्तीत नियमित तपासणीसाठी २०-२५ मिनिटे, तर बालघरे वस्ती व डुडुळगाव येथे दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळातही वीज समस्येमुळे नागरिकांचे हाल होत असल्याने, महावितरणने तातडीने सेवा सुधारण्याची गरज आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे












































