सातारा, १० एप्रिल २०२४ : चैत्र पाडव्याच्या मुहूर्तावर दरवर्षी महादेवाची मानाची कावड यात्रा साताऱ्यातून वाजत गाजत काढली जाते. काल देखील पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ही कावड वाजत गाजत सातारा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली.
मानाची असलेली महादेवाची कावड नाचवण्यासाठी शेकडो भक्तगण या यात्रेमध्ये सहभागी होत असतात. सातारा शहरातील मल्हार पेठ परिसरातील दरवेशी घराजवळून या मानाच्या कावड यात्रेला सुरुवात होते.
सातारा शहरातील ढोल गल्ली, शेटे चौक, कमानी हौद या मार्गे महादेवाच्या कावड यात्रेची मिरवणूक काढली जाते. कमानी हौद येथील महादेवाच्या मंदिरासमोर पारंपारिक वाद्याच्या निनादात शेकडो शंभू भक्त कावड नाचवण्याचा आनंद घेतात. त्यानंतर ही कावड यात्रा वाजत गाजत पुन्हा ढोर गल्लीतील महादेव मंदिरापर्यंत येते आणि या महादेव मंदिरा जवळ या कावड यात्रेची सांगता केली जाते. ही कावड यात्रा पाहाण्यासाठी शहरातील हजारो भाविक या वेळेला मल्हार पेठे येथे उपस्थित असतात.
गुढीपाडव्यानंतर ११ दिवसांनी ही कावड यात्रा सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र शिंगणापूरला जाते. त्यांनतर या कावडीच्या सहाय्याने महादेवाच्या पिंडीला पाणी घातले जाते आणि या कावड यात्रेची सांगता केली जाते. त्यावेळेला राज्यातून शेकडो कावड यात्रा शिंगणापूर येथे येतात. त्यामुळे या परिसरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी कावड यात्रा पार पडते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले