“एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो? एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी…”
ही ओळ ऐकताच मनात विचारांचा भुंगा उठतो. प्रेम म्हणजे काय? त्याची व्याख्या करता येईल का? प्रेमाला नियम असतात का? काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना पाहून मी हाच विचार करत होते. एका अशा प्रेमकहाणीची मी साक्षीदार झाली, जी ऐकल्यावर मन ढवळून निघालं.
ही कहाणी आहे तीन जणांची – एक बायको, एक प्रियसी आणि त्यांच्यातील “श्याम”. त्यांचं प्रेम वेगळं होतं, परंतु तेवढंच गूढही. सात वर्षांपासून एकमेकांवर जीव लावणाऱ्या एका प्रेमी युगुलाने शेवटी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्न करण्याचा निर्णय घेतला. साखरपुडा झाला, लग्नाच्या तयारीला वेग आला. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
लग्नाच्या काही दिवस आधीच परिस्थितीने कटू वळण घेतलं. घरची आर्थिक स्थिती खालावली. नवऱ्याच्या कुटुंबावर मोठं संकट आलं. लग्नासाठी आवश्यक असलेले पैसे मिळेना. तो मनातून तुटू लागला. सगळीकडे अंधार पसरला होता. त्याच वेळी एक अनोखी स्त्री त्यांच्या आयुष्यात आली. ती अप्सरेसारखी दिसत होती, पण तिच्या हातात काहीतरी वेगळंच होतं— लाखोंची रक्कम!
ती त्याच्या पुढे पैसे ठेवत म्हणाली, “जा कर लग्न.”
त्या क्षणी त्याने तिच्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यांत प्रचंड वेदना होती. पण त्या वेदनेच्या मागे प्रेम होतं, निस्वार्थ प्रेम! ती त्याच्या प्रियकराची पूर्वीची प्रियसी होती, पण आज त्याच्या आयुष्यात ‘मात्र’ एक मदतीसाठी आलेली स्त्री होती.
त्या मुलाने तिच्या मदतीमुळे लग्न केलं. सगळं काही व्यवस्थित पार पडलं. लग्नाच्या वेळी ती देखील तिथे होती, जोरजोरात नाचत, हसत, आनंदी असल्यासारखी भासत. पण तिच्या मनातील वेदना कुणालाही दिसली नाही.
त्या दिवशी त्या नवऱ्याला समजलं की, प्रेम म्हणजे केवळ एकत्र राहणं नव्हे, प्रेम त्यागाचं असतं. तिच्या त्या एका कृतीमुळे सात वर्षांपूर्वी केलेलं प्रेम सिद्ध झालं. पण प्रश्न असा उभा राहिला की, तो आता दोघींवरही प्रेम करू लागला होता का?
“प्रेम चुकलं का?”


नववधूला या सगळ्याची कल्पना होती. तिला माहीत होतं की, तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात एक अशी स्त्री होती, जिने त्याच्या आयुष्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. पण ती नवऱ्याला गमावू शकत नव्हती. त्याचवेळी दुसरीकडे ती पहिली प्रियसी अजूनही त्याच्यावर प्रेम करत होती.
बायको आणि प्रियसीमध्ये कोणाचा अधिकार मोठा?
“तो नवरा आहे की प्रियकर?”
हा प्रश्न अनेकदा त्यांच्या आयुष्यात उभा राहिला. एकीकडे बायको होती- जिच्यासोबत सात फेरे घेतले, संसार उभा करायचा होता. तर दुसरीकडे होती ती- जी त्याच्या डोळ्यातलं दुःख न बघू शकणारी, त्याला सुखी बघण्यासाठी स्वतःचं सर्वस्व त्याग करणारी.
तो गोंधळला होता. त्याला त्या दोघींची समजूत होती. एक होती राधा- जिचं प्रेम त्याने निवडलं होतं, जी त्याची बायको होती. तर दुसरी होती मीरा- जिचं प्रेम त्याला समजायला वेळ लागला.
त्याला त्या दोघींची तुलना आठवली, जी या ओळीतून स्पष्ट होत होती-
“एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी.”
राधा त्याच्यासोबत संसाराच्या प्रेमात होती, त्याच्या सुखदुःखात सहभागी होऊ इच्छित होती. तर मीरा त्याच्या अस्तित्वावरच प्रेम करत होती. तिला फक्त त्याचा सुखी चेहरा पुरेसा होता.
“शेवटी कोण जिंकलं?”


या संपूर्ण प्रसंगाचा शेवट काय झाला? काही गोष्टींना शेवट नसतो. त्या अनंतकाळ चालत राहतात. हाच प्रेमाचा गूढ मार्ग आहे.
त्या मुलाने अखेरच्या क्षणी एक गोष्ट स्पष्ट केली -“मीरा माझं प्रेम आहे, पण राधा माझं आयुष्य आहे!”
“प्रेमाला सीमा नसतात”
ही कहाणी सांगते की, प्रेमाची कोणतीही सीमा नसते. ते शुद्ध असतं. लग्नानंतरही प्रेम होऊ शकतं, लग्नाआधीही. कुणीतरी आपल्यासाठी काही करतं, त्याग करतो, वेदना सहन करतो, हेच खरं प्रेम.
शेवटी बायको आणि प्रियसी यांच्यातील संघर्ष समजून घेत, त्या दोघींना आपल्या जीवनात आपापल्या जागेवर ठेवत, त्या माणसाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
राधा आणि मीरा दोघीही त्याच्या आयुष्यात होत्या. त्याने त्यांची योग्य जागा शोधली. एक होती त्याची बायको, आणि दुसरी होती त्याच्या आठवणींची मीरा.
आजही तो त्या गाण्याच्या ओळी आठवतो, मनात विचार करतो-
“अंतर क्या दोनों की चाह में बोलो?”
आणि याच प्रश्नाच्या उत्तराने तो आयुष्यभर चालत राहतो…
न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे