कांदा निर्यातबंदी तातडीनं मागे घ्यावी ; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली विधानसभेत मागणी

मुंबई, १७ सप्टेंबर २०२० : कांदा निर्यातबंदी तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यांबाबत त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह राज्यातल्या अन्य मंत्र्यांनीही कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला विरोध केला असून निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली आहे.

दरम्यान कांदा निर्यात बंदीच्या विरोधात कालही नाशिकसह राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं सुरूच होती. नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली; तर संभाजी बिग्रेडच्या वतीने व्दारका चौफुलीवर निदर्शने करण्यात आली. पुणे, सोलापूर, धुळे आणि परभणी इथंही कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलनं करण्यात आली.

दरम्यान कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने काल पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात क्विंटल मागे जवळपास पाचशे ते साडेपाचशे रुपयांची घट नोंदवण्यात आली. काल क्विंटलला २००० ते २७०० रुपये असा भाव मिळाला. बाजार समितीच्या आवारात जवळपास १०० ट्रक एवढी कांद्याची आवक झाली. किरकोळ बाजारात मात्र कांद्याचा दर दोन चार रुपयांच्या फरकाने टिकून आहे.

पुण्याच्या बाजारातून काल तामिळनाडू, कर्नाटक तसंच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांना कांदा पाठवण्यात आला. सध्या कांद्याचा हंगाम नसून गरवा जातीचा उन्हाळी कांदा देशांतर्गत बाजाराबरोबरच बाहेरच्या देशांनाही पाठवण्यात येत असतो तर दुसरीकडे तामिळनाडूतल्या कांद्याचा नवा हंगाम सुरू झाला असला तरी दमट हवामानामुळे प्रतवारी खालावल्याने या मालाला फारशी मागणी नसल्याचं कांद्याचे घाऊक व्यापारी राजू पाटील यांनी सांगितलं.

जगातलं कांद्याचं आगार म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्ह्यात एकूण सतरा कृषी उत्पन्न बाजार समिती असून काल जवळपास पंधरा बाजार समित्यांमध्ये कांद्याची एकूण एक लाख १३ हजार क्विंटल एवढी आवक झाली. जरी निर्यातीवर बंदी असली तरी क्विंटलच्या भावात फारसा फरक पडला नसल्याचे राज्य कृषी पणन मंडळाचे उप सर व्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी सांगितले

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा