पुणे, १८ ऑगस्ट २०२१: बैल गाडी शर्यतीचा मुद्दा पुन्हा एकदा उठू लागला आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं. त्यात ते म्हणाले होते की, आमच्या सरकारच्या काळात बैलगाडी शर्यतीसंदर्भात कायदा केला होता. दुर्दैवाने त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. पण ती मागे घेण्यासाठी या सरकारने कोणतीही पाऊले उचलली नाहीत. राज्य सरकारने लोकांच्या भावना समजून घ्याव्यात. याला आता खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिउत्तर दिलंय.
कोल्हे म्हणाले की, बैलगाडा शर्यतीबाबत आपण घेतलेल्या भूमिकेचे मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, सांस्कृतिक वारसा, आंतरराष्ट्रीय पर्यटन व देशी गोवंशाचे संवर्धन या दृष्टीने महत्वाचा घटक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी ही आमची भूमिका असून त्यासाठी माझा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. बैल या प्राण्याचा ‘संरक्षित प्राणी’ या यादीतील समावेश केंद्र सरकारने वगळला तर बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होणे शक्य आहे. या मागणीसाठी तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन त्यांना तशी मागणी करणारे पत्र दिले होते.
संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाच्या काळात देखील विद्यमान पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तमजी रुपाला यांचीही भेट घेऊन पुन्हा एकदा त्यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. याशिवाय संसदेत याबाबत वेळोवेळी मी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी यासाठी आवाज उठविलेला आहे.
या कामी आपलीही साथ लाभली तर नक्कीच बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतील समावेश केंद्र सरकार लवकर वगळेल. यासाठी आपण सर्वांनी पक्षभेद विसरुन केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यास बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होणे आणखी सोपे होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे