नवी दिल्ली : फिनलँड देशाच्या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान सना मरीन यांनी देशातील कामगार वर्गासाठी एक महत्वपूर्ण प्रस्ताव मांडला आहे. फिनलँडमधील कार्यालयीन कालावधी कमी करुन तो दिवसाला सहा तास करावा. तसेच पाच दिवसांऐवजी चार दिवसांचा आठवडा करावा, असा प्रस्ताव मरीन यांनी मांडला आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रस्तावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
सना मरीन यांनी घेतलेल्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असून काहींनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करुन फिनलँडच्या पंतप्रधानांच्या या निर्णयाचा एकदा अभ्यास करा असा सल्लाही दिला आहे.
हा निर्णय म्हणजे महिलेच्या दृष्टीकोनात देश चालवण्याचा प्रयत्न आहे असं समजू नये. हा निर्णय देशातील कामगार वर्गाचे हित लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असं मरीन यांनी म्हटलं आहे.
मरीन यांनी हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्या वयाने तरुण असल्याने त्यांनी असा विचार केल्याची चर्चा देशातील राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाली आहे.