नवी दिल्ली, १९ फेब्रुवरी २०२१: बाबा रामदेव यांनी आज कोरोनाचे नवीन औषध बाजारात आणले आहे. नवीन औषध पुराव्यावर आधारित असल्याचा पतंजलीचा दावा आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नवीन औषध लॉन्चिंग प्रसंगी उपस्थित होते. नवीन औषधाचे नाव देखील कोरोनिल आहे. पतंजली च्या म्हणण्यानुसार कोरोनिल टॅब्लेटने आता कोविड चा इलाज केला जाऊ शकतो.
आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅब्लेट्स कोरोना औषधे म्हणून स्वीकारली आहेत. पतंजलीच्या म्हणण्यानुसार नवीन कोरोनिल औषध सीओपीपी-डब्ल्यूएचओ जीएमपी प्रमाणित आहे. हे औषध सुरू करताना बाबा रामदेव म्हणाले की योगा आयुर्वेद हे संशोधन आधारित उपचार वैद्यकीय पध्दती म्हणून अवलंबले जात आहे.
आपले नवीन औषध सुरु करताना बाबा रामदेव म्हणाले की, “गेल्या तीन दशकांपासून माझ्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. परंतु मी असे देखील म्हटले होते की तुम्ही आजार केवळ नियंत्रित करू शकणार नाही तर त्याचे पूर्णपणे उच्चाटन देखील करू शकता. आता पूर्ण सर्टिफिकेशन सोबत आमच्याकडे जवळपास २५० हून अधिक रिसर्च पेपर देखील आहेत. केवळ कोरोनावरच आमच्याकडे २५ सर्टिफिकेशन आहेत. त्यामुळे आता जगात कोणीही आमच्यावर प्रश्न उपस्थित करू शकणार नाही.”
यावेळी आचार्य बालकृष्ण म्हणाले की, “कोरोनील लोक आधीपासूनच वापरत होते. पण आता डीजीसीए नंतर आम्हाला डब्ल्यू एच ओ कडूनही परवानगी मिळाली आहे. मिळालेली ही परवानगी १५४ देशांसाठी आहे. त्यामुळे आता आम्ही अधिकारीक रित्या कोरोनील औषधाची निर्यात देखील करू शकतो.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे