पाटस टोलनाक्याचा ढिसाळ कारभार

फास्टटॅग यंत्रणेच्या वापराचा परिणाम ; स्थानिक वाहनांचा टोलमाफी प्रश्न कायम

दौंड : पुणे- सोलापूर महामार्गावरील पाटस टोल नाका हा कायमच स्थानिकांची सक्तीची टोलवसुली, ढिसाळ कारभार, नवीन प्रशासनाची मनमानी, दमदाटी, मारहाण व सुविधांच्या अभाव यासारख्या अनेक विवादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे.
टोलनाक्याचे प्रशासन बदलले की नव्या वादाला पुन्हा सुरुवात होत आहे. स्थानिकांना टोल माफी ही सुरुवाती पासुन असून देखील नव्या प्रशासनाचे अधिकारी या सर्व योजना बंद करुन नवीन वादाला तोंड फोडत असतात. सध्या सर्वत्र फास्टटॅग यंत्रणेला सुरुवात झाली असल्याने कुठलीही पुर्व सुनियोजीत यंत्रणेचा वापर न करता नवीन योजना लागु करून वाहन चालक, प्रवाश्यांना तासनतास वेठीस धरले जात आहे.
यामुळे स्थानिक वाहतुकीला नवीन अधिकारी यांच्यासोबत वादविवाद वाढत आहेत. दौंड तालुक्यातील विविध संघटनांनी या विरोधात निवेदन देऊन स्थानिकांना यामध्ये सुट देण्याची विनंती केली आहे.

फास्टटॅग यंत्रणा लागु करण्यासाठी पुरेसा वेळ न घेता अतिशय घाईने नियम सुरू केला गेला आहे. पुणे- सोलापुर महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची संख्या हजारोने असल्याने टोल नाक्यावर लांबच लांब रांगा लावल्या जात आहे. यामध्ये प्रवाश्यांचा तिळमात्र विचार न करता सरधोपटपणे नवीन नियम राबवले जातात. पाटस किंव्हा इंदापुर या दोन्ही टोल नाक्यावरील परिस्थिती फारशी वेगळी नसल्याचे वाहन चालक व प्रवाशी सांगत आहेत. फास्ट टॅगच्या यंत्रणेने वाहतुकीची कोंडी फुटेल असा विश्वास दाखवला जात होता. मात्र या उलट वाहनांना आणखीच उशीर होत असल्याचे चित्र दिसुन येत आहे. मात्र याबाबत फारसे कोणी बोलत नसल्याने टोल प्रशासन आपली मनमानी राबवत आहे.
दरम्यान, स्थानिकांना टोल माफीचा नियम लागु केला असताना यामध्ये वारंवार बदल का करावा लागतो. प्रशासनाचे अधिकारी बदलुन गेले की नवीन अधिकारी पुन्हा स्थानिक वाहनांना अडथळा निर्माण करू लागतात. याच प्रकरणात अनेक वेळा स्थानीक व टोल प्रशासन यांच्यामध्ये वाद पाहायला मिळतात. स्थानिकांना टोल माफ करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या, आमदार, खासदार यांच्या नेतृत्वाखाली झाली असताना देखील या सारख्या बाबी नव्याने का उपस्थित केल्या जात आहे.असा प्रश्न स्थानीक नागरीक विचारत आहेत.

सुविधा अपूर्ण वसुली पूर्ण…
पुणे सोलापुर महामार्गाच्या कामाला गती देताना स्थानिकांच्या आवाजाला पोलीस प्रशासनाच्या दबावाने खोडून काढण्यात आला होता. दिवस रात्र काम सुरू ठेऊन मुख्य मार्गाचे काम पूर्ण केले गेले. मात्र त्या सोबत असणाऱ्या सेवा रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन यंत्रणा गायब झाली. याबाबत अनेक वेळा विविध राजकीय नेतृत्वाला, शासकीय अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. मात्र प्रत्येक वेळेस फक्त उडवाउडवीच्या उत्तरातून निराश पदरी आली आहे. सेवा रस्त्याच्या अभावाने विविध गावातील नागरिकांनी आपला जीव गमावला असुन आज ही त्या समस्या आहे. त्याच परिस्थितीत आहेत.त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

दौंड तालुक्यातील पुणे सोलापुर महामार्गावरील पाटस, वरवंड, यवत ही गावे व्यवसायिक दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. या महामार्गावर पाटस टोल नाका हा कुरकुंभ, दौंड, रोटी, वासुंदे, मळद, जिरेगाव, कौठडी, रावणगाव इत्यादी गावांच्या अगदी जवळ असल्याने येथील स्थानीक वाहतुकदारांना नेहमीच या टोल नाक्यावरून प्रवास करावा लागतो. मात्र दिवसातून वारंवार प्रवास करावा लागल्याने टोल देण्याचा प्रश्न नेहमीच निर्माण होतो. यासाठी स्थानिकांनी टोल प्रशासनाला विविध ग्रामपंचायत, संघटना, पक्षाच्या पातळीवर लेखी निवेदन दिले आहेत. तत्कालीन प्रशासनाने ते तांत्रिकदृष्ट्या मान्य करुन स्थानिकांना टोल मधुन वगळले देखील आहे. मात्र नवीन प्रशासन आले की पुन्हा नव्याने ह्या प्रक्रिया पुन्हा कराव्या लागत असल्याने स्थानिकांना मोठ्या त्रासातून व वादविवादातून जावे लागत आहे.
– राहुल भोसले,सरपंच कुरकुंभ

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा