नवी दिल्ली, 12 मार्च 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएमला त्यांच्या एका सेवेत नवीन ग्राहक जोडणे ‘लगेच थांबवण्याचे’ निर्देश दिले आहेत. त्यामागचे कारणही त्यांनी दिले आहे.
पेटीएम पेमेंट बँकेचे ऑडिट
आरबीआयने पेटीएमला आपल्या पेटीएम पेमेंट्स बँक प्लॅटफॉर्मवर नवीन ग्राहक जोडणे त्वरित थांबवण्यास सांगितले आहे. यासह, मध्यवर्ती बँकेने प्लॅटफॉर्मच्या आयटी सिस्टमचे ऑडिट करण्यासाठी आयटी ऑडिट फर्मची नियुक्ती करावी, असे निर्देश दिले आहेत.
ऑडिटनंतर दिली जाईल मंजुरी
रिझव्र्ह बँकेचे म्हणणे आहे की, बँकेच्या कामकाजाच्या पुनरावलोकनादरम्यान त्यांना काही देखरेखीच्या समस्या लक्षात आल्या, त्या आधारावर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक पुन्हा जोडण्याची परवानगी देण्याचा निर्णय आयटी ऑडिटर्सच्या अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या विशेष परवानगीवर अवलंबून असेल.
बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1949 च्या कलम-35ए अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेला हे निर्देश दिले आहेत. रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे जी देशातील सर्व प्रकारच्या बँकांचे नियमन करते.
अलीकडेच रिझर्व्ह बँकेने देशातील अनेक पेमेंट बँकांचे परवानेही जारी केले आहेत. देशातील दुर्गम भागात पेमेंट संबंधित सुविधा सुलभ करण्यासाठी या पेमेंट बँकांची निर्मिती करण्यात आली आहे. यासह, हा भारत सरकारच्या आर्थिक समावेशन उद्दिष्टांचा एक भाग आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे