महापालिकेत अधिकाऱ्यांची ‘भेटीची वेळ’ म्हणजे निव्वळ ‘थट्टा’!

PCMC ‘Meeting Hour’ a Joke!
अधिकाऱ्यांची 'भेटीची वेळ'!

PCMC ‘Meeting Hour’ a Joke!: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सुरू केलेल्या ‘भेटीच्या वेळेचा’ पार फज्जा उडाला आहे. दर सोमवारी दुपारी तीन ते सहा ही वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव असताना, सोमवारी चक्क आयुक्त शेखर सिंह यांच्यासह तिन्ही अतिरिक्त आयुक्त आणि सहआयुक्त असे सर्वच वरिष्ठ अधिकारी गैरहजर होते! यामुळे आपली गाऱ्हाणी घेऊन आलेल्या शेकडो नागरिकांना रिकाम्या हाती परत फिरावे लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.

या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती, ज्यामुळे महापालिकेत आलेल्या अनेक नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. “निवृत्तीनंतर घराबाहेर पडणे अवघड असूनही समस्या घेऊन आलो होतो, वाटलं की आज भेटीचा दिवस असल्यामुळे अधिकारी तरी ऐकून घेतील. पण, येथे कोणीच नाही. ही तर थेट अपमानासारखी गोष्ट आहे,” अशी खंत एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केली.

सोमवारी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर तसेच सहआयुक्त मनोज लोणकर हे एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. उपस्थित कर्मचाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता, ‘आज साहेब आले नाहीत’ एवढेच उत्तर देऊन त्यांनी हात झटकले.

या प्रकाराने महापालिका प्रशासन लोकशाहीचा केवळ दिखावा करत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस नागरिकांच्या भेटीची वेळ जाहीर करूनही अधिकारीच गैरहजर राहत असतील, तर या भेटीच्या वेळांचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले की, “एक अतिरिक्त आयुक्त आणि सहआयुक्त रजेवर होते, तर इतर दोन अतिरिक्त आयुक्त महापालिकेच्या बैठकीसाठी बाहेर होते.” मात्र, असे असले तरी, नागरिकांना वेळेत माहिती न दिल्याबद्दल आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी एकाच वेळी गैरहजर राहिल्याबद्दल प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.

याच दिवशी, महापालिकेची १२२ कोटी रुपये खर्च करून आणलेली ‘डीएमएस’ प्रणाली देखील काही काळासाठी ठप्प झाली होती, ज्यामुळे नागरिकांना ऑनलाइन तक्रारी नोंदवतानाही अडचण आली. एकूणच, सोमवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेत नागरिकांची हाक अनुत्तरितच राहिली, असे म्हणावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे