प्रदुषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९ RMC प्रकल्पांना टाळे!

शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईचा बडगा उगारत, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) स्पष्ट निर्देशांनंतर, महापालिकेने ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख आणि मोशी परिसरातील आरएमसी (RMC – Ready Mix Concrete) प्लांट्सची सखोल तपासणी केली.

‘या’ त्रुटी आढळल्या, प्लांट्स झाले सील!

या तपासणीत धक्कादायक बाब उघड झाली की, तब्बल नऊ आरएमसी प्लांट्स प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करत नव्हते.
कारवाई दरम्यान, प्लांट्समध्ये खालील गंभीर त्रुटी आढळल्या:

  • वॉटर स्प्रिंकलिंग सिस्टीमचा अभाव (पाणी फवारणी व्यवस्था नसल्याने धूळ नियंत्रण होत नव्हते).
  • खुले मिक्सिंग ऑपरेशन्स (सिमेंट-वाळूचे मिश्रण उघड्यावर सुरू होते).
  • खडी-वाळू वाहतुकीदरम्यान ताडपत्रीचा अपुरा वापर (वाहतुकीदरम्यान धूळ हवेत मिसळत होती).
    प्रदूषण नियंत्रण नियमांचे हे उल्लंघन लक्षात घेऊन, महापालिकेच्या पर्यावरण विभागाने तात्काळ कारवाई करत या सर्व नऊ प्लांट्सना सील ठोकले आहे.

नागरिकांचे आरोग्य सर्वोच्च प्राधान्य

महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, “शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी आरएमसी प्लांट्सनी पर्यावरणीय निकषांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जात आहे.”

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी नियम न पाळणाऱ्यांना कोणतीही शिथिलता दिली जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले. ते म्हणाले, “नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण हेच सर्वोच्च प्राधान्य असून, कठोर
कारवाई पुढेही सुरूच राहील.”

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ही धडक कारवाई शहरातील इतर प्रदूषणकारी आस्थापनांना सख्त इशारा देणारी आहे. स्वच्छ हवेसाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल निश्चितच महत्त्वपूर्ण आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे