पवना जलवाहिनी प्रकल्प रखडल्याने पिंपरी-चिंचवडला पाणीटंचाई, मावळत्या आयुक्तांना मोठी खंत
पिंपरी-चिंचवड शहराला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प पूर्ण न करू शकल्याची मोठी खंत महापालिकेचे मावळते आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केली आहे. मंगळवारी (दि. ७) त्यांची बदली झाल्यानंतर बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही कबुली दिली. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता, तर शहराला सध्या सुरू असलेल्या एक दिवसाआड पाणीपुरवठ्याऐवजी दररोज पाणीपुरवठा करणे शक्य झाले असते, असे सिंह म्हणाले.
प्रकल्पासाठी लागणारा मोठा निधी आणि त्यासाठी राज्य शासनाची मदत न मिळणे, ही काम पूर्ण न होण्याची मुख्य कारणे त्यांनी सांगितली. तसेच, मुळशी आणि ठोकळवाडी धरणाचे पाणीही आणण्याचे प्रयोजन पूर्ण होऊ शकले नाही, याचीही त्यांनी नोंद घेतली.
कार्यकाळात गाजलेल्या काही निर्णयांवरही त्यांनी भाष्य केले. वाकड येथील विकसकाला कामाच्या बदल्यात दिलेला टीडीआर आणि कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई यामुळे त्रास झाल्याची कबुली त्यांनी दिली, मात्र हे दोन्ही निर्णय प्रशासकीय दृष्ट्या आणि महापालिकेच्या विकासासाठी आवश्यक होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘अर्बन स्ट्रीट’ भविष्यासाठी महत्त्वाचा!
शहरातील वाहतूक कोंडीवरील उपाय म्हणून राबविण्यात येत असलेल्या ‘अर्बन स्ट्रीट’ प्रकल्पाचे त्यांनी समर्थन केले. आज नागरिकांना हा प्रयोग योग्य वाटत नसला तरी, भविष्यातील वाहतूक कोंडीवर तोच शाश्वत उपाय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाल्यास याचा मोठा फायदा होईल.
‘श्रीमंत पालिकेचा काळ गेला’
“पिंपरी-चिंचवड महापालिका एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असल्याचा लौकिक होता, पण आता तो काळ राहिला नाही,” असे स्पष्ट मत व्यक्त करत, सध्या प्रकल्पांचा खर्च १०० ते २०० कोटींपर्यंत गेल्याने कर्जरोखे उभारावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. मोशी येथील कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पाने महापालिकेला देशभरात वेगळ्या उंचीवर नेल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. पालकमंत्री अजित पवार यांची नाराजी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे












































