पाण्याची मीटर बसवण्याच्या कामात अडथळा आणल्यास थेट ‘गुन्हा’ दाखल होणार!

शहरातील पाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता एक अत्यंत कठोर आणि महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. वाढती लोकसंख्या आणि मर्यादित पाणीसाठा पाहता, पालिकेने शहरातील प्रत्येक नळजोडणीवर पाणी मीटर बसवण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत जर कोणत्याही व्यक्तीने किंवा समूहाने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर नियमानुसार थेट गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी दिले आहेत!

शहराला पुरवठा होणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब मोजला जावा आणि पाण्याचा अपव्यय थांबवावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. पाणी मीटरमुळे पाण्याचा अचूक वापर कळेल, ज्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे करणे शक्य होईल. यामुळे पाण्याची गळती रोखता येईल आणि अनधिकृत वापर देखील टळेल.

शहरात तब्बल १० हजारांहून अधिक अनधिकृत नळजोडण्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे, मीटर बसवण्याच्या कामासोबतच अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याच्या कारवाईलाही गती देण्याचे आदेश जांभळे-पाटील यांनी दिले आहेत.

यावेळी, व्यावसायिक पाणी वापराकडेही पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. हॉटेल्स, वॉशिंग सेंटर्स, बांधकामे, आर.ओ. प्लांट्स, रेस्टॉरंट्स अशा व्यावसायिक वापरासाठी पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत वापर तत्काळ थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहराच्या हितासाठी नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी या मोहिमेला पूर्ण सहकार्य करावे आणि त्वरित पाणी मीटर बसवून घ्यावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्तांनी केले आहे. पाणी वाचवा, अन्यथा गुन्हा दाखल होईल, असा सज्जड इशाराच पालिकेने दिला आहे!

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे