मेट्रो कामामुळे पाणी बंद नागरिकांनो, पाणी जपून वापरा!

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना! निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून नेहरूनगरकडे जाणारी मुख्य जलवाहिनी गुरुवारी (दि. ३० ऑक्टोबर) स्थलांतरित करण्याचे महत्त्वपूर्ण तांत्रिक काम महापालिका हाती घेणार आहे.

यामुळे शहराच्या अनेक महत्त्वाच्या भागांतील पाणीपुरवठा एक दिवसासाठी खंडित होणार आहे.
गुरुवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून, यामध्ये नेहरूनगर, संत तुकारामनगर, महेशनगर, गंगानगर, वल्लभनगर, कासारवाडी, फुगेवाडी, तसेच चिखली येथील हरगुडे वस्ती, पवार वस्ती, कुदळवाडी, आणि जाधववाडी या परिसरांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, या कामाचा परिणाम म्हणून शुक्रवारी (दि. ३१ ऑक्टोबर) सकाळचा पाणीपुरवठाही अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाण्याचे होणारे संभाव्य हाल विचारात घेऊन पाण्याचा पुरेसा साठा गुरुवारी सकाळपर्यंतच करून ठेवण्याचे आणि उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.

या तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाच्या कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिले आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे