मुंबई, १२ मे २०२१: अंबानी यांचे घर ॲन्टीलिया ते मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. गेले दोन महिन्यांपासून सापडलेल्या स्फोटका प्रकरणी आणि या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानला जाणाऱ्या मनसुख हिरेन या व्यक्तीची हत्या या दोन आरोपांवरून सचिन वाझे गेले दोन महिने कोठडीत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याप्रकरणी आदेश काढले आहेत. याशिवाय लवकरच पोलीस अधिकारी रियाझ काझी आणि सुनील माने यांनाही सेवेतून बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अँटालिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं 19 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सचिन वाझेनं कोर्टाकडे काही खाजगी गोष्टींसाठी केलेला अर्ज कोर्टानं स्वीकारला आहे. वाझे यांना जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, वॉशिंग पावडर, साबण, मीठ, साखर आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषधं देण्यास कोर्टाची परवानगी दिली आहे.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणाची पूर्ण कल्पना होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने केला होता. मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं, याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता, असं सूत्रांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे