पुरंदर, ११ नोव्हेंबर २०२०: पोलीस पाटील हा पोलीस प्रशासनासाठी महत्त्वाचा दुवा आहे. गावातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटलांनी सतर्क असायला हवे. गावात येणाऱ्या टोळ्या फिरिस्ते लोक यांच्यावर लक्ष ठेवावे. संभाव्य धोके लक्षात देवून पोलीस तसेच महसूल प्रशासनास वेळीच माहिती द्यावी. अशा सूचना जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनील महाडिक यांनी केल्या आहेत.
पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी नुकताच जेजुरी पोलीस स्टेशनचे पदभार स्वीकारला आहे. यानंतर त्यांनी जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस पाटील यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पुढील काळात जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्था राखसाठी कोण कोणत्या उपाय योजना कराव्या लागतील याबाबत चर्चा केली. प्रत्येक पोलीस पाटलांच्या गावातील असणाऱ्या समस्या व पुढील काळात करावयाच्या उपाय योजना याबाबत आढावा घेत पोलीस पाटील यांनी गावात काम करीत असताना करावयाच्या कामांबाबत सूचना दिल्या. पुढील काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामध्ये पाटलांनी कोणत्याही गतटतात सहभागी नहोता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशील रहावे. पुरंदर मध्ये सध्या विमानतळ होत असल्याने गावात शहरातील लोकांचे जमीन खरेदी विक्रीसाठी येणे जाणे वाढले आहे. अशा व्यवहारातून फसवणुकीचे किंवा मारमारीचे प्रकारही होऊ शकतात. गावामध्ये अनेक अनोळखी लोक किंवा फिरणाऱ्या टोळ्या येत असतात. या लोकांची माहिती पाटलांनी ठेवावी. याच्या माध्यमातून गावातील लोकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून अशा लोकांची पोलिसांना माहिती द्यावी. अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. गावामध्ये कोणत्याही प्रकारचे अकस्मात मयत झाल्यास त्याबाबत तात्काळ पोलिस स्टेशनला खबर द्यावी गावामध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू असल्यास त्याबाबतही अवगत करावे खेड्यापाड्यांमध्ये घरगुती हिंसाचाराचे व महिलांचे अन्यायाशी गुन्हे खूप होत असतात त्याला कुणीही वाचा फोडत नाही. याबाबत गोपनीय माहिती पोलिस प्रशासनास द्यावी गावातील बांधावरील वाद व घरगुती किरकोळ वाद हे गुन्हे तडजोडीने बीट अंमलदार याच्या मदतीने मिटवावेत.
यावेळी पोलीस पाटील संघाच्या वतीने जेष्ठ पोलीस पाटील कुंडलिक तांबे, तालुका पोलिस पाटील संघाचे कार्याध्यक्ष मोहन इंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय कुंजीर यांनी महाडिक यांचे स्वागत केले. यावेळी सर्वच गावातील पोलीस पाटील उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी राहुल शिंदे