पुणे, २९ ऑक्टोबर २०२०: पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर हे मागच्या बुधवारी सायंकाळच्या दरम्यान बेपत्ता झाले होते. मात्र ,अद्याप अजूनही त्यांच्याबाबत कोणताही तपास लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी शिवाजीनगर व गुन्हे शाखेच्या पोलिसांची पाच पथके काम करीत आहेत. सीसीटीव्ही व इतर तांत्रिक गोष्टींच्या माध्यमातून त्यांचा शोध सुरू असला, तरी अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. मात्र यादरम्यान आता नवीन शंका उपस्थित झाली आहे. यानुसार गौतम पाषाणकर यांचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यांचे सुपूत्र कपिल पाषाणकर यांनी वडिलांच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे. तसेच यामागे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोपही कपिल यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर कपिल पाषाणकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचा दावा केला आहे. तसेच त्या राजकीय व्यक्तीची माहिती त्यांनी पुणे पोलिसांना दिली आहे.
“या प्रकरणी स्वत: ती राजकीय व्यक्ती नाही, पण त्यांच्याशी संबंधित असलेला व्यक्ती असण्याची शक्यता आहे. वडिलांना ज्या काही आर्थिक अडचणी होत्या किंवा जे काही त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. त्याची चौकशी आम्ही केली, तेव्हा गेल्या दोन ते तीन महिन्यात नेमकं काय घडलं होतं, त्यांना एवढा तणाव कशामुळे होता, याची ड्राईव्हर किंवा इतरांकडून माहिती घेतली. त्यात एक जो व्यक्ती आहे, तो सतत त्यांना पैशासाठी धमकी द्यायचा. त्याने वडिलांवर केस केली होती,” अशी प्रतिक्रिया गौतम यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे