नागपूर, ५ जुलै २०२३: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर नागपूरला पोहोचल्या असून त्या गडचिरोली येथील गोंडवाना विदयापीठाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत आणि इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये सर्वोच्च घटनात्मक पद स्वीकारल्यानंतर मुर्मू यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे.
राष्ट्रपतींचे मंगळवारी सायंकाळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपती आज गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या १०व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करतील आणि नंतर नागपुरातील कोराडी येथील भारतीय विद्या भवनाच्या सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन करतील.
गडचिरोली जिल्हा अति संवेदनशील आणि नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी मोठी यंत्रणा तैनात करण्यात आली. १४४ कलम लागू करण्यात आले आहे. जवळपास १५०० पोलीस जवान, ६३९ हवालदार आणि १५१ अधिकाऱ्यांसह सर्व आयुक्त, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रपती गुरुवारी नागपुरातील राजभवन येथे असुरक्षित आदिवासी गटाच्या सदस्यांशी संवाद साधतील आणि त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईला रवाना होणार आहेत, जिथे त्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने राजभवनात आयोजित केलेल्या नागरी स्वागत समारंभात सहभागी होतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड