माढा, दि. ६ सप्टेंबर २०२०: रेंदाळ, जि. कोल्हापूर येथील कवीवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा कादंबरीसाठीचा पुरस्कार महेंद्र कदम यांच्या ‘तणस’ साठी जाहीर झाला.
”धूळपावलं” आणि ”आगळ” या कादंबऱ्यांनंतर लोकवाङ्मय गृह मुंबई यांच्याकडून ‘तणस’ ही त्यांची तिसरी कादंबरी प्रकाशित झाली आहे. आजच्या संभ्रमित पिढीच्या वर्तमान काळाला कवेत घेणारी ही कादंबरी म्हणजे अपेक्षाभंगाची भळभळती जखम घेऊन वावरणाऱ्या पिढीची कथा आहे. समाजातल्या विविध स्तरांतले तरुण संघर्ष करताना यात पहायला मिळतात. तणसच्या रूपाने ‘वाहनतळ’ मराठी कादंबरीत पहिल्यांदाच अवतीर्ण झाला आहे. जिवंत आणि प्रत्ययकारी चित्रणातून ‘तणस ‘च्या रूपाने प्रगल्भ आणि वेगळी अनुभूती वाचकांना येते.
रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
या पुरस्कार निवड समितीसाठी डॉ. रणधीर शिंदे , डॉ. गिरीश मोरे आणि डॉ. रफीक सूरज यांनी काम पाहिले. वाचनालयाचे अध्यक्ष श्री. आर. एम. पाटील यांनी जाहीर केले आहे. या पुरस्काराबद्दल आ. बबनदादा शिंदे, आ. संजयमामा शिंदे, जि. प. सदस्य रणजितसिंह शिंदे, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह शिंदे, विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
यापूर्वी महेंद्र कदम यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह भैरू रतन दमाणी, बाबा पद्मनजी आदी १७ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील













































