Pune agriculture department seizes fake fertilizers: पुणे कृषी विभागाने शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे बनावट रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत, सुमारे ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील मुख्य संशयिताकडेच कृषी केंद्राचा परवाना असून, तो याच परवान्याच्या आडून बोगस खतांची विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी संतोष दिनकर वेताळ आणि महेंद्र गणपत शेलार (दोघे रा. न्हावरे, ता. शिरूर) यांच्याविरोधात शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय दिनकर पाटील यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
पुणे कृषी विभागाला न्हावरा ते गुणाट रोडवरील गट नंबर ३१३ मध्ये काही व्यक्ती बेकायदेशीरपणे रासायनिक खतांची निर्मिती करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पुणे कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय पाटील, शिरूर पंचायतचे कृषी अधिकारी दिनेश अडसुळ, कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ आणि गुण नियंत्रण अधिकारी डॉ. प्रवीण कदम यांच्या पथकाने २७ मे २०२५ रोजी या ठिकाणी छापा टाकला.
पथकाला तिथे अमोनियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट यांसारख्या खतांचे उत्पादन किंवा साठवणुकीचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना, फसवणूक करून बनावट खत निर्मिती करताना आढळले. परवान्यात मंजूर नसलेल्या आणि अन्य कंपनीच्या खतांचे उत्पादन करून ते पिशव्यांमध्ये भरण्याचे काम तिथे सुरू होते.
या गुन्ह्यातील मुख्य संशयित संतोष वेताळ याच्याकडे कृषी खते व औषधे विक्रीचा परवाना असल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे. त्याचा परवाना रद्द करण्याबाबत कृषी आयुक्त कार्यालयाकडे लवकरच प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती कृषी गुणवत्ता नियंत्रक धनंजय पाटील यांनी दिली. या कारवाईमुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना चाप बसणार असून, कृषी विभागाच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे