मिळकतकर थकबाकीदारांना सुवर्णसंधी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारीपर्यंत योजनेचा लाभ
पुणे महापालिकेने (PMC) मिळकत कराच्या थकबाकीदारांसाठी एक महत्त्वाची आणि आकर्षक ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत थकबाकीदारांना दंडाच्या (शास्ती) रकमेवर तब्बल ७५ टक्के इतकी मोठी सूट मिळणार आहे. महापालिकेच्या तिजोरीसाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेला मिळकत कर वसूल करण्यासाठी हा एक मोठा प्रयत्न आहे.
ही अभय योजना १५ नोव्हेंबर पासून सुरू होणार असून ती १५ जानेवारी पर्यंत, म्हणजेच दोन महिन्यांसाठी, लागू राहील. जुन्या हद्दीसह नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील मिळकतदारांनाही याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे, ज्यांच्याकडे अनेक वर्षांपासूनची थकबाकी आहे, त्यांना दंडातील मोठी रक्कम माफ करून मूळ कर भरण्याची ही सुवर्णसंधी आहे.
यांना मात्र ‘नो-एंट्री’
या योजनेतून मोबाईल टॉवर कंपन्यांच्या मिळकती वगळण्यात आल्या आहेत. तसेच, यापूर्वी महापालिकेच्या ‘अभय योजने’चा लाभ घेऊनही पुन्हा थकबाकीदार झालेल्या सुमारे १ लाख ४० हजार मिळकतधारकांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. त्यांच्याकडून थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका स्वतंत्र मोहीम राबवणार आहे.
कर भरणा कसा करायचा?
थकबाकीदार नागरिक महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांवर, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक, जनता सहकारी बँक आणि कॉसमॉस बँक येथे कर भरू शकतात. याव्यतिरिक्त, propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सर्व नागरी सुविधा केंद्र शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहणार आहेत.
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली आहे. एकरकमी कर भरणाऱ्यांसाठी ही मोठी सवलत असल्याने थकबाकीदारांनी याचा लवकरात लवकर लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे













































