प्रदूषित शहरांचा यादीतही पुण्याचे नाव दाखल

43

पुणे, १२ डिसेंबर २०२२ : प्रदूषण म्हटले, की पहिले शहर समोर येते ते म्हणजे दिल्ली; परंतु दिल्लीने मुंबईला प्रदूषणाबाबत मागे टाकले असे असतानाच आता प्रदूषित शहरांचा यादीत पुणे शहराचे नावही जोडले गेले आहे. मुंबईमधील सततचे बदलणारे वातावरण, तेथील वाहनांची गर्दी यामुळे मुंबईची हवा सातत्याने अत्यंत खराब या श्रेणीत नोंदविण्यात येत होती; पण रविवारी पुण्याच्या हवेचा गुणवत्तेचा दर्जा खराब नोंदविण्यात आला आहे.

औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यांत झपाट्याने वाढ झाल्याने वायुप्रदूषणामुळे हवेतील विषारी घटक प्राणघातक पातळीपर्यंत वाढले आहेत. तर वातावरणात उठलेल्या धूलिकणांमुळे हवेच्या गुणवत्तेचा दर्जा अत्यंत खराब आणि खराब श्रेणीत नोंदविण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहे. अर्थातच वायुप्रदूषणासाठी शहरांमधील वाहने जबाबदार आहेत. वाहनांमधून निघणारी ज्वलनशील हवा ही वायुप्रदूषणास कारणीभूत असणारा महत्त्वाचा घटक असू शकते. यावर एक्झॉस्ट उत्सर्जन कमी करण्यास आणि फिल्टर प्रक्रिया करण्यास तंत्रज्ञानाची मदत घ्यावी, असे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने हवेत फेकल्या जाणाऱ्या विषारी घटकांपैकी ७० ते ९० टक्के घटक आपण कमी करू शकतो.

पुण्यात हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खराब नोंदविण्यात आला असल्याची काही कारणे समोर येत आहेत. थंडीत धूलिकण जास्त वर जात नसल्याने ते जमिनीवर राहतात आणि त्यामुळे शहरातील माणसांवर, प्राण्यांवर त्याचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे वाऱ्याचा वेग कमी असल्याने धूलिकण वाहून जाण्यासही मदत होत नाही. तर पुण्यातील थंडीचे तापमान जास्त असल्याने त्या धूलिकणांचा आरोग्यावर थोडाफार परिणाम होऊ शकतो. यावर हवेची तपासणी करणे हा महत्त्वाचा उपाय आहे. देशातील हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी ठेवण्यासाठी भारताला किमान ४००० एअर मॉनिटरिंग स्टेशनची आवश्यकता आहे. तरच हवामानाची नोंद ठेवणे व त्यावर उपाय करणे सोपे होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा