‘आर. बी. किड्स’ ग्रामीण भागातील उदयोनमुख अधिकारी निर्माण करणारी संस्था होईल : विश्वासराव भोसले

फलटण, ३० जानेवारी २०२३ : आजच्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, हा उदात्त दृष्टिकोन समोर ठेवून आसू (ता. फलटण) येथील आर. बी. किड्स ही ग्रामीण भागातील उदयोनमुख अधिकारी तयार करण्याची संस्था निर्माण होईल, असा विश्वास माजी निवृत्त अधिकारी विश्वासराव भोसले यांनी व्यक्त केला. ते कै. राजारामबापू माने पाटील एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आर. बी. किड्स अँड इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विशालसिंह माने पाटील होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र बापू पवार, प्रा. वाघ सर, कुस्ती क्षेत्रातील वस्ताद बाळासाहेब साबळे, सहकार क्षेत्रातील रामभाऊ माने, क्रीडा क्षेत्रातील प्रा. दिलीप माने, संस्थेच्या व्हॉईस चेअरमन प्रमिला माने पाटील, आर. बी. किड्सचे प्राचार्य आनंद पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आसू (ता. फलटण) हे पूर्व भागातील गाव असून, या गावामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा आणि त्याचा पहिलाच बक्षीस वितरण समारंभ संपन्न होत असताना मला खूप आनंद होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेक स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चमकदार कामगिरी करतील अशा प्रकारचे शिक्षण त्यांना लहान वयातच मिळाले पाहिजे. जर असे शिक्षण लहान वयातच मिळाले तर ग्रामीण भागातील मुले ही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये टिकतील व उद्याचे भावी अधिकारी बनण्यास मदत होईल.

आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये अभ्यासाबरोबरच खिलाडूवृत्ती जोपासणे गरजेचे आहे. विविध प्रकारच्या छोट्या-छोट्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारी करणे गरजेचे असल्याचे मत निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी व्यक्त केले.

संस्था ही ग्रामीण भागातील असली तरी या संस्थेमध्ये उच्चशिक्षित शिक्षकवृंद असून, लहान मुलांवर योग्य ते संस्कार केले जात आहेत. त्यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असून, भावी काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये ‘आसू मॉडेल’ नावाचा उपक्रम उदयास येईल, असे मत संस्थेचे चेअरमन विशालसिंह माने पाटील यांनी व्यक्त केले.

आर. बी. किड्स अँड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते स्पोर्ट्स डे व शालेय उपक्रमांमध्ये हिरिरीने सहभाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्र व ट्रॉफीचे वितरण करण्यात आले. बक्षीस वितरणा कार्यक्रमानंतर स्नेहसंमेलनास सुरवात करण्यात आली त्यामध्ये चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध प्रकारच्या गाण्यांवरती उपस्थित पालक व मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांना मंत्रमुग्ध करून सोडले. संस्थेच्या काळातील हा पहिलाच कार्यक्रम असल्याने यावर्षीचा स्टुडंट्स ऑफ द इयर २०२२-२३ चा पुरस्कार शीर्षा घोरपडे व पृथ्वीराज पाटणकर यांना देण्यात आला.

कार्यक्रमास पालक, पूर्व भागातील विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. आशा वाघचौरे, शंकर शिंगाडे, सुबोध चव्हाण, बाळासाहेब घाडगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली शिंदे व विनया मोरे यांनी केले, तर उपप्राचार्य पूजा मोरे यांनी आभार मानले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा