जयपूर, १८ फेब्रुवारी २०२३ :पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शनिवारी राजस्थानमधील सात ठिकाणी छापे टाकले.
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएच्या टीमने राजस्थानमधील कोटा येथे तीन पदाधिकारी, सवाई माधोपूर, भिलवाडा आणि बुंदी येथे प्रत्येकी एक ठिकाणी संशयितांच्या निवासी आणि व्यावसायिक जागेची झडती घेतली. छापेमारीपूर्वी या प्रकरणी सुरु असलेल्या कारवाईत राजस्थानमधून तीन आरोपींना ताब्यात घेतले असून,या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीचे नाव मोहम्मद सोहेल असे आहे. एनआयएने आरोपी सोहेलला शांतता भंग आणि जातीय द्वेष पसरवण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. यापूर्वी, एनआयएने या प्रकरणातच दोन आरोपी सादिक सर्राफ आणि आरोपी मोहम्मद आसिफ यांनाही अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध १९ सप्टेंबर २०२२ रोजी एनआयए मुख्यालय नवी दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.