सातारा, २ जून २०२३: मेंढा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रस्तावित अन्यायकारक विकास आराखडा आणि वाढीव चतुर्थकर आकारणी, शास्तीकर स्थगित न करता रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मेंढा ग्रामस्थ, शेतकरी बचाव संघाच्या वतीने मेंढा बाजार पेठ बंदची हाक देण्यात आली. त्यास बाजार पेठेतील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के दिवसभर बंद पाळून पाठिंबा व्यक्त केला आहे.
अन्यायकारक विकास आराखड्याबाबत बाधीत शेतकरी बांधवांनी नगरपंचायतीकडे आपल्या हरकती नोंदविल्या होत्या. अन्यायकारक कलवाढीसोबत विकास आराखडा मान्य नसल्याचे शेतकऱ्यांनी आपल्या हरकती नोंदविल्या होत्या. या प्रकरणावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी बैठक घेवून या प्रकरणाला शासनदरबारी स्थगिती आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शासनदरबारी तसा कुठलाही पत्रव्यवहार नगरपंचायतीकडे आला नसल्याने नगरपंचायतीने आपले काम सुरूच ठेवलं आहे.
बाधीत शेतकऱ्यांनी व्यक्तिगत दाखल केलेल्या हरकतीवर आपले म्हणणे मांडण्यासाठी ३० ते ३१ मे आणि सार्वजनिक हरकतीच्या सुनावणीसाठी १ जून तारीख जाहीर करण्यात आली होती. त्याबाबत तशा ७३४ शेतकऱ्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. सार्वजनिक सुनावणीला जाण्यासाठी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर ते नगरपंचायत कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला, अन्याय कारक विकास आराखडा आणि अन्यायकारक करवाढ रद्द करा या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर