पश्चिम घाटातील वनसंपदा झपाट्याने कमी होत असल्याने या प्रजातीचा अधिवास बदल
Raorchestes ghatei:पुण्यातील बावधन मध्ये असणाऱ्या ‘आर्यन्स मीडिया हाऊस’च्या आवारात दुर्मिळ ‘राओरचेस्टेस घाटेई’ हा झुडूप बेडूक आढळून आलाय. या प्रजातीच्या बेडकांची लांबी १९ ते २५ मिलिमीटर म्हणजेच साधारणतः २ सेंटीमीटर एवढीच असते. याच्या पायाच्या बोटांमध्ये जाळी कमी असून त्वचा दाणेदार असते. या बेडकातील नरांच्या पाठीवर तपकिरी रंगाचा गडद ठिपका असून पाठीच्या मध्यभागी काळी पट्टी असते. ही प्रजाती २०१३ला, सरपटणाऱ्या जीवांवर संशोधन करणाऱ्या डॉक्टर एच.व्ही.घाटे यांनी शोधलीय, त्यामुळे त्यांच्या नावावरून या प्रजातीला “घाटेई” हे नाव देण्यात आलंय.


महाराष्ट्र राज्यातील उत्तर पश्चिम घाटात यांचा अधिवास आढळतो.ही प्रजाती सामान्यतः ६०० ते १००० मीटर उंचीवर, पश्चिम घाटातील अर्ध-सदाहरित जंगले आणि झुडुपांच्या भागात आढळतात. सध्या सुरु असणाऱ्या पावसामुळे ह्या जातीचे बेडूक आढळून आलेय. पश्चिम घाटातील वनसंपदा झपाट्याने कमी होत असल्याने त्याचा परिणाम या प्रजातीवरसुद्धा झाल्याचं संशोधक सांगतायत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे