कोलकाता, ७ एप्रिल २०२३: आयपीएलच्या १६ व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या होम ग्राउंड इडन गार्डनवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ८२ धावांनी विजय मिळवला. कोलकाताचा हा या वर्षातील पहिला विजय ठरलाय. रहमानउल्ला गुरबाज आणि शार्दुल ठाकूर यांच्या अर्धशतकांच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ८२ धावांनी पराभव केला. ठाकूरने रिंकू सिंग सोबत सहाव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केल्याने केकेआरने सात गड्यांच्या मोबदल्यात २०४ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना बंगळुरूचा डाव १२३ धावांतच आटोपला. त्यानंतर केकेआरच्या वरुण चक्रवर्ती ४, सुनील नरेन २ आणि सुयश शर्माने ३ विकेट घेत आरसीबीला १७ व्या षटकात नमवलं.
विराट कोहली आणि फाफ डुप्लेसी यांनी ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्सविरुद्ध दमदार फलंदाजी केली, त्या दोघांनी कोलकाताविरुद्धही काहीशी अशीच सुरुवात केली. २०५ धावांचे लक्ष्य असल्यानं गरजही तशीच होती. दोघांनी ४ षटकात ४२ धावा ठोकल्या होत्या. या दोघांना रोखण्यासाठी कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने पॉवरप्लेमध्येच चेंडू सुनील नरिनकडं सोपवला. पाचव्या षटकात फिरकीला सुरुवात झाली आणि इथून बंगळुरूची पडझड सुरू झाली. सुनील नरेनने (२/१६) विराट कोहलीला (२१) पहिल्याच षटकात बोल्ड केलं.
नरेनच्या गुगलीवर कोहलीच्या धाडसीपणाचा इतका परिणाम झाला की, त्यानंतर पुढचे तीन फलंदाजही बोल्ड झाले आणि तिघेही वरुण चक्रवर्तीच्या (४/१५) गुगलीला बळी पडले. फाफ डुप्लेसी (२३) आणि ग्लेन मॅक्सवेल या दिग्गजांनाही गुगली समजू शकली नाही. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या १९ वर्षीय फिरकी गोलंदाज सुयश (३/३०) यानेही आपले कौशल्य दाखवत दिनेश कार्तिकसह विकेट्स घेतल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड