पुणे, २१ जुलै २०२२: मैत्रिणीच्या घरी गेले, तर तिचा मुलगा चक्क पुस्तक वाचताना दिसला. त्याच्या हातात मोबाईलच नव्हता…मी तिला विचारले, की अगं हा चक्क पुस्तक वाचतोय. मोबाईलच्या ऐवजी मुलांच्या हातात पुस्तकं दिसणे, म्हणजे अहो आश्चर्यमं की. तेव्हा मैत्रिणीने काही गोष्टींची जाणीव करुन दिली. रिडींग का करावे आणि कसे करावे, हे स्पष्ट केलं.
तिने सांगितले की, सध्याचे जग हे मोबाईलचे आहे. त्यात कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण या विळख्यात अडकले. त्यामुळे पुस्तके जणू कालबाह्य व्हायला लागली. पण यामुळे मुलांच्या मनावर परिणाम व्हायला लागला. तो परिणाम नकारात्मक असल्याने किशोरवयीन मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू लागले. यासाठी आम्ही वाचन तास ही संकल्पना अस्तित्वात आणली.
१. जुनं ते सोनं या प्रमाणे आमच्या घरात रोज एक तास वाचन करणे हा नियम आहे. त्या काळात टीव्ही, मोबाईल, कम्पुटर पूर्णपणे बंद असतो. याचे शास्त्रीय कारण म्हणजे वाचनाने मेंदूला सिग्नल मिळून मेंदू अँक्टीव्ह होतो.
२. मोबाईलच्या रेंजमुळे मेंदूची क्षमता घटते आणि मेंदू आळशी होतो. या उलट वाचनाच्या काळात मेंदूवरचा एक सोमॅटोसेन्सोरी कॉरटेक्स हा भाग अँक्टीव्ह होतो. ज्यामुळे वाचन केलेल्या गोष्टी कायमच्या स्मरणात राहतात.
३. वाचनाने एके ठिकाणी बसण्याची सवय लागते. जेणेकरून एकाग्रता वाढते.
४. मोबाईलच्या रेंजमुळे डोळ्यांना त्रास होतो, तर पुस्तक वाचण्याने डोळे दमून गाढ झोप लागते. जी सध्याच्या काळात अतिशय गरजेची मानली जाते.
५. वाचनाने शब्दसंचय वाढतो. त्यामुळे भविष्यात भाषा सुधारण्यासाठी वाचनाचा पर्याय हा उत्तम मानला जातो.
६. वाचनाने तुमचे मन गुंतून राहते. मनाची चलबिचल कमी होते.
७. शक्यतो सुरुवातीला पालक आणि पाल्य यांनी एकत्र वाचन करावे. जेणेकरुन पालकांना मुलांची प्रगती समजू शकते.
८. काय वाचावे आणि कसे वाचावे, याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आता क्लासेस घेतले जातात. ज्यात फास्ट रिडींग आणि स्लो रिडींग अशा प्रकारचे वाचन शिकवले जाते.
९. ग्रंथालय हा काळानुरुप मागे पडणारा प्रकार आहे. पण तो आता पुन्हा वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.
१०. वाचन ही एक प्रकारची ध्यान धारणा आहे. ती मन लावून केल्यास तीचे फळ अतिशय उत्तम रित्या मिळते. पण मन लावून करण्याची गरज आहे, एवढं मात्र खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस