सरीसृप- पट्टेरी रेती सर्प / वाळू साप (Leith’s sand snake)

पट्टेरी रेती सर्प किंवा वाळू साप हा दुर्मिळ असा साप आहे. सहसा हा साप दिसत नाही. भारतात महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि हिमालयाच्या भागातही हा साप सर्वत्र पण कमी प्रमाणात आढळतो. दुर्मिळ प्रजातीत याचा समावेश आहे. अशाच प्रकारचे साप म्यानमार, चीन, नेपाळ, पाकिस्तान मध्ये आढळतात. पाकिस्तानात याला रिबन साप असे नाव आहे. कोल्युब्रिडी / लेंप्रोफिड सर्प कुळातील हा साप असून अंड्यातून यांचे प्रजनन होते. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात पट्टेरी रेती सर्प आढळतात. 

हा साप दाट व खुरटी जंगले, खडकाळ प्रदेशात आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्र ते पंजाब या पश्चिम भारतातील जंगल भागात आढळतो. याचे नाव रेती किंवा वाळू सर्प असले तरी तो रेती अथवा वाळूत आढळत नाही, मुख्यतः मातीत राहणारा हा साप असला तरी झाडावर सुद्धा तितक्यात सराईतपणे वावरतो.
पूर्ण वाढ झालेल्या  पट्टेरी रेती सर्पाची लांबी दोन ते साडेतीन फुटापर्यंत असते. सडपातळ, लांब व गोल शरीर, शेपटी लांब व बारीक तसेच अत्यंत निमुळती असते. तपकिरी डोक्यावर काळपट तपकिरी रेषा असुन डोळे मोठे असतात. फिक्कट तपकिरी, बदामी, हिरवट शरीरावर समांतर पाच गडद तपकिरी पट्टे किंवा रेषा असल्यामुळे याला पट्टेरी साप हे नाव पडले.

हा साप दिनचर असल्याने दिवसा फिरतो, तो शिकार करताना अत्यंत चपळ हालचाली साठी प्रसिद्ध आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे सरपटताना डोके वर उचलून सरपटतो. याच्या अंगावरील गडद तपकिरी रंगाचे समांतर पट्टे हे सुद्धा याचे वैशिष्ट्य आहे. यावरून तो तात्काळ ओळखता येतो. हा साप हरणटोळ सारखा निमविषारी /सौम्य विषारी आहे. सरडे, सापसुरळी, उंदीर, बेडूक, कधी कधी छोटे साप हे याचे खाद्य आहे. माणसाच्या दृष्टीने हा साप निरुपद्रवी असल्याने या दुर्मिळ वन्य जीवाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा