मंत्रालय प्रवेशावर निर्बंध ;दहा हजारांपेक्षा जास्त पैसे नेण्यास मनाई

मुंबई, २७ सप्टेंबर २०२३ : राज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयाच्या इमारतीत प्रवेश करण्यावर आता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक मजल्यासाठी वेगळ्या रंगाचे मर्यादित पास यापूढे दिले जातील. शिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्तची रोकड आणि बाहेरील खाद्यपदार्थ मंत्रालयात नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयात घुसून अचानक केली जाणारी आंदोलने, इमारतीवरून उडी मारण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी असे प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत. मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर महिनाभरात पारदर्शक स्टीलची जाळी लावण्यात येईल. इमारतीच्या टेरेसवर जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या संख्येवरही मर्यादा घालण्यात आली आहे. प्रत्येक मजल्यासाठी स्वतंत्र रंगाचे पास, ज्या विभागात काम आहे त्याच मजल्यावर प्रवेश दिला जाईल, अशा उपाययोजना यात समावेश आहे.

मंत्रालयाच्या गार्डन गेटजवळील मोकळ्या जागेत अद्यायावत अभ्यागत कक्ष उभारण्यात येणार असून, तेथे पास काऊंटर, बॅग तपासणी आदीची सुविधा असेल, काही वर्षांपूर्वी मंत्रालय प्रांगणात संरक्षक जाळी उभारण्यात आली. आता त्या जाळीवरच ठिय्या आंदोलनाचे प्रकार सुरू झाल्याने सरकारसमोर नवाच प्रश्न उभा राहिला. याशिवाय शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून मंत्रालयातील वाढलेल्या गर्दीने प्रशासकीय यंत्रणांवरही ताण पडला आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा