कोल्हापूर, ३० ऑगस्ट २०२३ : कोल्हापूर-सांगली रस्त्यांची झालेली दुरवस्था दुर करण्यासाठी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे ८५० कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. हा आराखडा केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या हाय पाॅवर कमिटीकडे प्रलंबित आहे. हा प्रस्ताव तातडीने मंजूर होण्यासाठी खासदारांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. या आराखड्यात हातकणंगलेसह विविध ठिकाणी उड्डाण पुलाचे नियोजन आहे.
वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करायला भाग पाडणाऱ्या कोल्हापूर सांगली रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यापूर्वी हा रस्ता सुप्रिम कंपनीकडे ‘बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्वावर दिला होता, मात्र ठेकेदारांनी केवळ ६५ ते ७० टक्के काम करुन टोल लावण्याची भुमिका घेतल्याने वाद सुरू झाला. ठेकेदार आणि राज्य शासनाच्या वादांमुळे हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यास अडचण होती.
सत्ताधारी खासदार असूनही प्रस्ताव धूळ खात जिल्ह्यात लोकसभेचे दोन आणि राज्यसभेचे एक असे तीन खासदार आहेत. हे तिन्ही खासदार महायुतीचे म्हणजेच केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आहेत. या तिन्ही खासदारांनी पाठपुरावा केला तर प्रस्ताव मंजूर होण्यास फार वेळ लागणार नाही, अशी नागरिकांत चर्चा आहे. खासदारांकडून या कामासाठी पाठपुरावा का केला नाही, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर