संकेतची चांदीची झळाळी, भारताला मिळाले पहिले रौप्य पदक

इंग्लंड ३० जुलै, २०२२ : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने आपलं खातं उघडलं आहे. संकेत सरगरने रौप्य पदक मिळवून भारताच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. भारताचा वेटलिफ्टर संकेत महादेव सरगर याने वेटलिफ्टिंगमध्ये त्याने ५५ किलो वजनी गटात एकूण २४८ किलोग्राम वजन उचलत रौप्य पदक पटकावले आहे. यावेळी मलेशियाच्या मोहम्मद याने २४९ किलोग्राम वजन उचलत सुवर्णपदक मिळवलं.

५५ किलो वजनी गटात सहभागी संकेतने क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नातच १३५ किलोग्राम वजन उचललं. ज्यामुळे तो सर्वांत पुढे पोहोचला. त्यानंतर स्नॅच राऊंडमध्ये ११३ किलोग्राम वजन संकेतने उचललं. त्यामुळे त्याने एकूण २४८ किलोग्राम वजन उचलत एक दमदार असा सुवर्णपदकासाठी प्रयत्न केला.
दुसऱ्या प्रयत्नात संकेतने १३९ किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो अयशस्वी झाला. तेव्हाच त्याच्या हातालाही दुखापत झाली. तिसऱ्या प्रयत्नात १३९ किलो वजन उचलण्याचा त्याने प्रयत्न केला पण दुखापतीमुळे तो अयशस्वी ठरला. ज्यामुळे अखेर त्याचा स्कोर २४८ किलोग्राम इतकाच राहिला.
मलेशियाच्या बिन कसदन मोहम्मद याने १४२ किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला. संकेतला मागे टाकण्यासाठी मलेशियाच्या खेळाडूला तिसऱ्या प्रयत्नात १४२ किलोग्राम वजन उचलणं अनिवार्य होतं. ज्यात तो यशस्वी ठरला. त्यामुळे एकूण २४९ किलोग्राम वजन उचलत त्याने थेट सुवर्णपदक मिळवलं. तर संकेतला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. केवळ एका किलोच्या फरकाने संकेचं सुवर्णपदक हुकलं.

संकेत सरगर हा मूळचा सांगलीचा असून त्याच्या वडिलांची पानाची टपरी आहे. त्यामुळे हलाखीच्या परिस्थितीतून प्रयत्नांच्या जोरावर संकेतने एक मोठं यश मिळवलं आहे. त्याने केवळ आणि केवळ मेहनत आणि अथक परिश्रमांच्या जोरावर ही कामगिरी केली असल्याने आज त्याचं सर्व भारतातून कौतुक होत आहे.
कुठेही कष्ट केले, तर त्याचे फळ मिळतचं, हे संकेतच्या प्रयत्नातून दिसून आलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा