संस्कारक्षम पिढी घडवणारे शिक्षण विद्यापीठांनी द्यायला हवे: कोश्यारी

पुणे : विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन संस्कारक्षम पिढी घडवणारे शिक्षण विद्यापीठांनी द्यावे , असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि भारत अस्मिता फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ९ वा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान समारंभ बुधवारी ( दि.८) रोजी एमआयटी युनिव्हर्सिटी कोथरुड कॅम्पसमध्ये पार पडला. यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते.
कार्यक्रमात महापौर मुरलीधर मोहोळ, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, अध्यक्ष डॉ. सुरेश घैसास, प्रख्यात संगणक तज्ज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, कार्याध्यक्ष राहुल कराड, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरु डॉ. एन.टी.राव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी विष्णुपंत केरु गायखे (पळसे, ता. जिल्हा नाशिक) यांना कृषीरत्न पुरस्कार, कुशावर्ता चंद्रशेखर बेळे(देवणी, जिल्हा लातूर) यांना समाजरत्न पुरस्कार (लातूर), डॉ. संदीप मनोहर डोळे (नारायणगाव, जिल्हा पुणे) यांना आरोग्यरत्न पुरस्कार, सुधीर बाळासाहेब खाडे (नळदुर्ग, जिल्हा उस्मानाबाद) यांना शिक्षणरत्न पुरस्कार, ऋचा राहुल धापेश्वर (पुणे) यांना क्रीडारत्न पुरस्कार, सरपंच पुरुषोत्तम अंबादास घोगरे (खिरगव्हाण, जिल्हा अमरावती) यांना ग्रामरत्न पुरस्कार तर बचतगट रत्न पुरस्कार पूजा नितीन खडसे (धुळे) यांना, तसेच जनजागरण रत्न पुरस्कार जयप्रकाश आसाराम दगडे (लातूर) यांना तर ह. भ. प.सुधाकर महाराज इंगळे (सोलापूर) यांना अध्यात्म रत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी ‘राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार नवरत्न परिचय’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी कोश्यारी म्हणाले, महात्मा गांधीजीनी दिलेल्या सत्य व अहिंसेचा विचार रुजवणे गरजेचे आहे. हे शिक्षण विद्यार्थ्यांना विद्यापीठांमधून द्यायला हवे. जगाला शांती हवी आहे. तथापी आयुष्यभर ‘शांतीʼच्या शोधात भटकत राहून देखील मनाला शांती मिळत नाही. विश्वशांतीचा संदेश देणारा भारत हा एकमेव देश असून मन:शांतीसाठी सर्वप्रथम आत्मज्ञानाची शक्ती प्राप्त करुन घ्यायला हवी, असे ते म्हणाले.
याशिवाय विविध क्षेत्रातील नवरत्न शोधून त्यांचा सन्मान करण्याचे कौतुकास्पद कार्य राहुल कराड यांनी तर डॉ. विश्वनाथ कराड हे या विद्यापीठाच्या माध्यमातून शांतीचा संदेश देत आहेत. कुटूंबाबरोबरच विद्यापीठांमधूनही मुलांना चांगले संस्कार देणे गरजेचे आहे. सरकारी व सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्याचे धडे शिक्षणाव्दारे विद्यार्थ्यांना दयायला हवेत. तसेच परस्परांमध्ये मतभिन्नता असली तरीही एकमेकांच्या विचारांचा आदर राखून जवळीक साधण्याचे संस्कार विद्यार्थ्यांना दयायला हवे.

डॉ.विजय भटकर म्हणाले, एमआयटी विद्यापीठ हे विद्यार्थ्यांना संस्काराची देणगी देणारे व विश्वशांतीचा संदेश देणारे विद्यापीठ आहे. गावागावांत चांगले कार्य पोहोचवण्याचे काम येथून व्हावे.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे हे शिक्षण व सांस्कृतिक पार्श्वभूमी असणारे तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. समाजमन जपण्याचं भान ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासून समाजातील व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करण्याचे काम या विद्यापीठाच्या माध्यमातून होत आहे. पुरस्कारार्थींच्या वतीने जयप्रकाश दगडे यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल कराड यांनी स्वागत पर भाषण केले. प्रास्ताविकातून डॉ. विश्वनाथ कराड यांनी विद्यापीठाची माहिती दिली. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मंगेश कराड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा