Ashadi Wari Traffic Management Pimpri-Chinchwad: आषाढी वारीनिमित्त आयोजित श्रीक्षेत्र आळंदी येथून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले. गुरुवारी (दि. ५) पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. येत्या १९ जून ते ६ जुलै दरम्यान हा पालखी सोहळा होणार आहे.
समन्वय बैठकीत वाहतूक, गर्दी नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्थेवर सविस्तर चर्चा;

या बैठकीत वारीच्या काळात होणारी प्रचंड गर्दी, वाहतूक व्यवस्था, वाहनतळ (पार्किंग) नियोजन, मनुष्यबळाचा योग्य वापर आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आयुक्त चौबे यांनी यावेळी वारीदरम्यान उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणी, विशेषतः वाहतूक कोंडी आणि गर्दी नियंत्रणाबाबत आढावा घेतला. तसेच, आवश्यक त्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
या महत्त्वपूर्ण बैठकीला अतिरिक्त पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर, सहायक आयुक्त राजेंद्रसिंग गौर, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भीमराव नरके, सतीश नांदुरकर यांच्यासह श्रीक्षेत्र ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, आळंदी विश्वस्त समितीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरू, ह.भ.प. शांतीनाथ महाराज, पालखी प्रस्थान सोहळ्याचे प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, ह.भ.प. चैतन्य महाराज लोंढे, ह.भ.प. श्रीमहंत पुरुषोत्तम महाराज, मुरलीधर पाटील आणि रोहिणी पवार हे उपस्थित होते.
या समन्वय बैठकीमुळे आषाढी वारीचा पालखी सोहळा सुरळीत आणि शांततेत पार पडण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे लाखो वारकऱ्यांसाठी हा एक सुखकर आणि सुरक्षित अनुभव ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे












































