प्रवाशांचा संताप अनावर,येलवाडीत ‘रास्ता रोको’ आंदोलन; खड्डेमय रस्त्याने ग्रामस्थ आणि वारकरी मेटाकुटीला!

Yelwadi Rasta Roko protest over pothole-ridden pilgrimage road
येलवाडीत 'रास्ता रोको' आंदोलन;

Yelwadi Rasta Roko protest over pothole-ridden pilgrimage road: देहूगाव ते तीर्थक्षेत्र येलवाडीमार्गे तळेगाव-चाकण रस्त्याला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरवस्थेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि ‘तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग कृती समिती’ने आज येलवाडी प्रवेशद्वारासमोर तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन पुकारले. मान्सूनपूर्व पावसाने रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे प्रवाशांचे, विशेषतः औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे आणि वारकऱ्यांचे अतोनात हाल होत असल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा उद्रेक झाल्याचे दिसून आले.

तळेगाव व चाकण औद्योगिक वसाहतींना जोडणारा देहूगाव ते येलवाडी-देहूफाटा हा मार्ग लाखो कामगारांसाठी आणि कच्च्या-पक्क्या मालाच्या वाहतुकीसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र, या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून, प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत. “प्रशासनाने वारंवार केवळ आश्वासने दिली, पण प्रत्यक्षात काहीच केले नाही,” अशी तीव्र नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली.

विशेषतः, श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देहूमध्ये येणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. तुकाराम बीज यात्रा, आषाढी पालखी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रा अशा तीन मोठ्या यात्रांमध्ये वारकरी मोठ्या संख्येने याच मार्गाचा वापर करतात. खड्डेमय रस्त्यांमुळे वारकऱ्यांची वाट बिकट झाली असून, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या आंदोलनात देहूरोड विभागाचे भाजपा अध्यक्ष रघुवीर शेलार, संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, येलवाडीचे माजी सरपंच व कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे, विद्यमान उपसरपंच ऊर्मिला गायकवाड, दिलीप डोळस यांसारख्या अनेक मान्यवरांनी सहभाग घेऊन आपले मनोगत व्यक्त केले. पीएमआरडीएचे सुरेश कानडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता अश्विनी पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून निवेदने स्वीकारली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले असले तरी, ग्रामस्थांनी यापूर्वीच्या केवळ आश्वासनांवरून आता त्वरित कार्यवाहीची मागणी केली आहे.हा रस्ता त्वरित रुंद करून त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे, जेणेकरून लाखो प्रवाशांना आणि वारकऱ्यांना दिलासा मिळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे