शिवजयंतीचा जल्लोष: पुणे शहर दणाणले!

19

पुणे १९ फेब्रुवारी २०२५:छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुणे शहरात उत्साहाचा सागर उसळला. ढोल-ताशांच्या गजरात, केसरी झेंड्यांच्या लाटेत आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले.
सकाळपासूनच शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ऐतिहासिक शनिवारवाडा, लाल महाल, सिंहगड रस्ता आणि डेक्कन परिसरात शिवप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. पारंपरिक वेशभूषेत सज्ज झालेले नागरिक महाराजांना अभिवादन करत आहे.

युवावर्गाचा उत्साह तर ओसंडून वाहत आहे.बाईक रॅलीमध्ये भगवे झेंडे फडकवत, डीजेच्या तालावर तरुणांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी वातावरण दणाणून टाकले. महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत भगव्या साड्यांमधील महिलांनी मिरवणुकीत विशेष रंगत भरली, तर काहींनी घोडेस्वारी करत शिवकालीन परंपरांचे स्मरण करून दिले.

शहरातील मंडळांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित देखावे उभारले आहे. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. प्रत्येक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष घुमत आहे . डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसत होती, तर पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवजयंतीला ऐतिहासिक रंगत प्राप्त झाली आहे.

पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने संपूर्ण सोहळा शांततेत पार पडत आहे तर शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम, व्याख्याने आणि रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहे. हा उत्सव केवळ जल्लोष करण्यापुरता मर्यादित नव्हता, तर शिवरायांच्या विचारांचा प्रसार करण्याची प्रेरणा देत होता.

पुणेकरांचा उत्साह पाहून असे वाटले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज आजही कायम आहे. संपूर्ण शहराने एकदिलाने या सोहळ्यात भाग घेतल्याने पुण्याचे वातावरण शिवमय झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा