नाशिकमध्ये धक्कादायक घटनेने खळबळ, राष्ट्रवादीच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला

नाशिक, १४ डिसेंबर २०२२ : नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी डॉ. प्राची पवार यांच्यावर अज्ञात टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात डॉ. प्राची पवार गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. डॉ. प्राची पवार या ‘मविप्र’ संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार आणि ‘राष्ट्रवादी’चे दिवंगत नेते वसंत पवार यांच्या कन्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार डॉ. प्राची पवार या मंगळवारी रात्री गोवर्धन शिवारात असलेल्या आपल्या फार्म हाऊसमध्ये गेल्या होत्या.

यावेळी हल्लेखोरांपैकी दोघेजण फार्म हाऊसलगतच्या झाडीत लपून बसले होते. डॉ. प्राची पवार या दुचाकीवरून आल्या असता, त्यांनी या दोघांना हटकलं तेव्हा हल्लेखोरांनी अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’च्या आधारे संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.

डॉ. प्राची पवार यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्ला कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप सांगितले नाही. या घटनेने नाशिक शहरात एकच खळखळ उडाली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा