नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी वाहन चोरट्याला केली अटक, ४ प्रकरणे उघड तर १.१० लाखांचा माल जप्त

नागपूर, २ जुलै २०२३: वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून चोरीच्या ५ दुचाकींसह एकूण १,१०,००० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. अल्केश उईके (२५, रा. बैतुल जिल्हा, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.

घटनेची हकीकत अशी की, प्रवीण घनश्याम चौबे (वय ३५, रा. मातोश्री नगर, वानाडोंगरी) हे रामदासपेठ येथे गेले होते. त्यांनी आपली दुचाकी लॉक केली आणि हॉस्पिटलमध्ये गेले. मात्र, हॉस्पिटल मधून बाहेर येईपर्यंत त्यांची दुचाकी कोणीतरी चोरून नेली. प्रवीणने लगेच सीताबर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना आरोपीची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार गस्तीदरम्यान सापळा रचून अल्केशला मिठानीम दर्ग्याजवळ पकडले.

चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याला अटक करण्यात आली. अधिक चौकशीत अल्केशने अमरावती, वाठोडा, कळमेश्वर येथून वाहने चोरल्याची कबुली दिली आणि त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी चोरीची वाहने जप्त केली. डीसीपी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय सबनीस, एपीआय कदम, पीएसआय तिवारी, मेगर, देशमुख, रंभापुरे यांनी कारवाई केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा