जालन्यात शासकीय कार्यालय, विश्रामगृह परिसरात मिरवणुका, सभा घेण्यावर निर्बंध लागू

जालना २ एप्रिल २०२४ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम दि.१६ मार्च २०२४ रोजी घोषित केला. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय व संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या, उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे. सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डींग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीणे, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे इत्यादी बाबी नियंत्रीत करणे आवश्यक झाले आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन या आदेशाद्वारे वरील ठिकाणी वरिलप्रमाणे कृती करण्यास निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दि.६ जुन २०२४) निर्बंध घालण्यात येत आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा