लहान मोठ्या शाश्वत प्रकल्पांचं नियोजन करावं – जयंत पाटील

नाशिक, २३ सप्टेंबर २०२० : पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी राज्यातल्या नाशिक, नगरसह गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पाला मिळावं यासाठी लहान मोठ्या शाश्वत प्रकल्पांचं नियोजन करावं तसंच छोटे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखावेत अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल नाशिकमध्ये दिल्या.

जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. लहान जलसिंचन आणि वळण प्रकल्प वेळेत करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल प्रसंगी कर्ज काढूनही निधी दिला जाईल असं पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या भूमीवर पडणारं पाणी महाराष्ट्रालाच मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न केले जातील असं संपर्क मंत्री छगन भूजबळ यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान केंद्र सरकारचं कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्यामुळेच त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. केंद्र शासनाने ते रेटून नेल्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांच्या बरोबर राहून लढा उभारू असं जयंत पाटील यांनी काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मुदद्यावर सर्व मंत्री आणि सरकार एकत्र आहेत, त्यामुळे मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचं सांगून कोणी राजकारण करू नये असा टोलाही त्यांनी लगावला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा