पुणे, ३० एप्रिल २०२०: देशातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशातील सर्वात जास्त प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. असे असले तरी पुणे हा हॉट स्पॉट म्हणून घोषित केला गेलेला आहे. सध्या पुण्यामध्ये परिस्थितीत सुधारणा होताना दिसत आहे. आत्ता पर्यंत पुणे विभागातील ३०५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले.
विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९०५ झाली आहे. तर संक्रमित रुग्ण १५०४ आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण ९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७७ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरिक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयात १७३८ बाधीत रुग्ण असून ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात ४३ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात ८१ बाधीत रुग्ण असून ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात ३० बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकूण १९ हजार २३ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी १८ हजार ५९ चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर ९६४ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी १६ हजार २१२ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून १९०५ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागातील ६२ लाख ८९ हजार ७०१ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत २ कोटी ४२ लाख ११ हजार २५६ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी १ हजार ४१४ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.