नाशिक, दि.२मे २०२०: दोन दिवसापूर्वी आपापल्या गावी जाण्यासाठी राज्य सरकारने विशेष नियमावली तयार केली आहे. त्या- त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हे नोडल धिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये प्रवास करताना तसेच कामानिमित्त अडकलेल्या परप्रांतीय मजूर, कामगार आणि नागरिकांची संख्या अजूनही लक्षणीय आहे. अशा सर्व परप्रांतीय लोकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गर्दी केली होती. नाशिकमध्ये अडकलेल्या परराज्यांमध्ये कामगारांना सोडण्यास सुरुवात झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो कामगारांनी गर्दी केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
आपापल्या गावी जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी अशी मागणी या परप्रांतीय नागरिकांनी केली. मात्र मागणी करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला असल्याचे चित्र पहायला मिळाले.
नाशिक शहरातील अनेक परप्रांतीय कामगार, मजूर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याने कार्यालयाच्या बाहेर वाहनांची एकच गर्दी झाली. सरकारवाडा पोलिसांना कळवल्यानंतर गर्दी कमी झाल्याचे चित्र पहायला मिळाले
गावी जाण्यासाठी परवानगी मिळावी या मागणीसाठी हे लोक जिल्हाधिकारी कार्यालयात आले, तेव्हा जिल्हाधिकारी हे उत्तरप्रदेशच्या लखनऊला सोडलेल्या परप्रांतीय कामगारांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सोबत होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: