कसलीही जाहिरातबाजी न करता समाजसेवा

कदमवाकवस्ती : करोना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता गावागावात ठीक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी व गावात करोना या भयानक महामारी पासून, बचाव करण्यासाठी म्हणून पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीच्या कार्यामुळे त्यांचे पूर्व हवेलीतील सर्व क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे. तर “कोरोना वॉरिअर्स” म्हणून या समितीतील सदस्यांना संबोधले जात आहे.

या समितीच्या माध्यमातून डॉ. रतन काळभोर,रमेश कोतवाल, उदय वाघमारे, राम भंडारी, ज्ञानेश्वर शिंदे, शब्बीर पठाण, अशोक शिंदे, ज्ञानेश्वर नामुगडे, डॉ.अविनाश वाघमारे, विशाल शिंदे, समीर शेख, निलेश वाघमारे, अमोल खोले हे दिवसरात्र नागरिकांची कोरोना संदर्भात जनजागृती करीत आहेत. यामध्ये अशोक शिंदे यांनी सुरू केलेल्या शिवभोजनास चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या लॉक डाऊनमध्ये उपासमार होत असलेले नागरिक येथे जेवणासाठी येत असून हे जेवण पूर्णपणे मोफत दिले जात आहे.

     सर्वधर्म समभाव या तत्वानुसार या समितीत सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन कोरोना च्या लढ्यात आपली मोठी भूमिका बजावताना दिसत आहेत. सकाळी ९ वाजता सर्वजण डॉ. रतन काळभोर यांच्या दवाखान्याजवळ एकत्रित होऊन तिथून पुढे गस्त घालण्यासाठी सर्वजण निघतात व विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना समजावून घरी जाण्यास सांगतात. आजपर्यंत डॉ. रतन काळभोर यांनी पूर्ण कदमवाकवस्ती परिसरात ४०००० च्या आसपास नागरिकांची मोफत तपासणी केली आहे. नागरिकांनी दिलेल्या शिधापासून दररोज संध्याकाळी पुणे सोलापूर महामार्गावरून चालत घरी निघालेल्या भुकेल्या नागरिकांना येथे मोफत जेवण दिले जात आहे.डॉ.रतन काळभोर यांच्या पत्नी डॉ.वनिता काळभोर यांचीही या कार्यात मोलाची भूमिका आहे.काळभोर यांचे रुग्णालय दिवसरात्र सुरू असल्याने रात्री अपरात्री कोणी भुकेला आला तर रात्री स्वयंपाक बनवून त्यांना जेवण दिले जात आहे.

नागरिकांनीं केलेल्या मदतीने कन्हैया केटर्सचे दत्ता अंबुरे व त्यांचे मित्र परिवार हे गेली १६ दिवस जेवण बनवायचा कसलाही मोबदला न घेता मोफत जेवण बनवून ते उपासमार होत असलेल्या नागरिकांना देत आहेत. अश्या प्रकारे कदमवाकवस्तीचे हे कोरोना वॉरिअर्स समाजासाठी अहोरात्र काम असल्याने या समितीचे कौतुक पूर्व हवेलीतील सर्व भागांतून होत आहे.

                                                                                                          प्रतिनिधी-ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा