सोनिया गांधींनी शब्द दिलाय, काँग्रेस पाच वर्ष शिवसेनेसोबत राहणार: नाना पटोले

पुणे, २१ जून २०२१: काल नाना पटोले पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदा विषयी चर्चेवर वक्तव्य केलं. काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार हे विधान खूप चर्चेत राहिलं होतं. यानंतर मुख्यमंत्रीपदावरून देखील अनेक चर्चा रंगल्या होत्या. याआधी देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील असं स्पष्ट केलं होतं. याविषयी त्यांनी काल पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं. ‘स्वबळाचा नारा लावणं चुकीचं नाही. त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. असा नारा दिल्याने महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही.’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

काँग्रेस पाच वर्ष शिवसेनेसोबत सत्तेत राहणार आहे, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल पुण्यात दिली. भाजप आणि काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. स्वबळावर लढूनच पाच वर्षे सरकार चाललंय. स्वबळाचा नारा देणं चुकीचं नाही. काँग्रेस शिवसेनेसोबत पाच वर्ष राहणार आहे. सोनिया गांधी यांनी त्यांना तसा शब्द दिला आहे, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल पक्षप्रमुख म्हणून बोलले, असंही पटोले यांनी सांगितलं.

राऊतांना टोला

काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याबाबतचं एकमत आहे. आम्ही स्वबळावर लढणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणारच. आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत आहे. त्यात आम्ही स्वबळावर लढू, असं सांगतानाच ते कदाचित आमची भाषणं ऐकत नसतील, असा चिमटा पटोले यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना काढला.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहून भाजपशी युती करण्याचं आवाहन केलं आहे. त्यावरही त्यांनी अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सरनाईकांनी पत्रं लिहिलं. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात काँग्रेस पडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा