प्रयागराज २९ जानेवारी २०२५ : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात शुक्रवारी गंभीर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १० हून अधिक भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले. लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांची अनियंत्रित गर्दी ही या दुर्घटनेचे मुख्य कारण ठरले आहे
या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतकांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींनी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना पंतप्रधान मोदींनी केली. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करून पीडितांना तातडीने मदत पुरवण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाला अधिक दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. भाविकांची वाढती संख्या पाहता, यापुढे गर्दी नियंत्रणासाठी आणखी कडक उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाविकांची सुरक्षित घरवापसी सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री योगींनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून प्रयागराजहून अधिक रेल्वेगाड्या सोडण्याची विनंती केली आहे.या दुर्घटनेनंतर भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने अतिरिक्त पोलिस फौज तैनात करून सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत केली आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जात आहे.
महाकुंभ हा विश्वातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असला तरी, या दुर्घटनेने सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. प्रशासनाकडून आता आणखी कठोर उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे