आत्महत्यांचे सत्र थांबेना; महाराष्ट्रातील या जिल्ह्यात दोन महिन्यांत ५६ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

यवतमाळ, ३१ ऑगस्ट २०२२: शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्यानंतरही दुष्काळाची झळ सोसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र कमी होताना दिसत नाही. या वर्षी जुलै महिन्यात १८ तर ऑगस्ट महिन्यात ३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील तीन वर्ष दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना यावर्षी चांगले पीक येईल अशी आशा होती. पण सततच्या अतिवृष्टीने व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे अद्याप शासकीय
मदत मिळाली नसल्याने जिल्ह्यात आत्महत्या वाढत आहे.

दुर्दैवी बाब म्हणजे सर्वत्र पोळा सण साजरा होत असताना तीन दिवसात नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. तात्काळ मदतीची गरज असताना मदतीच्या केवळ घोषणा करण्यात येत आहेत. आणखी एका शेतकरीने आज सकाळी आत्महत्या केली आहे.

मारेगाव तालुक्यातील शिवणी येथील शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरिदास सूर्यभान टोनपे असे नाव आहे. त्यांच्याकडे पाच एकर शेती होती. त्यांच्यावर बँकेचं व खाजगी कर्ज होतं. त्यांचे शेतीमध्ये भरपुर नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहीती समोर आली आहे‌.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा