प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना खासदारकीवरून हटवावे, सुप्रिया सुळे यांनी याचिका केली दाखल

पुणे, ५ जुलै २०२३ : सध्या महाराष्ट्रातील राजकीय स्थिती चांगली नाही. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेतून आणि सुनील तटकरे यांना लोकसभेतून अपात्र करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत.

तटकरे यांना अपात्र ठरवण्यासाठी सुळे यांनी मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि लोकसभेचे सरचिटणीस यांच्याकडे याचिका दाखल केली, तर राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यांनी पटेल यांना अपात्र ठरवण्यासाठी राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याकडे याचिका दाखल केली. शरद पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

हे दोन्ही नेते अजित पवार आणि इतर ८ आमदारांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. या पक्षविरोधी कारवाया आहेत. पक्ष नेतृत्वाच्या नकळत त्यांनी हे कृत्य केले आहे. राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीच्या कलम २ (ए) अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची अपात्रता मागितली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.

राष्ट्रवादी कोणाची, याचा निर्णय आज होणार आहे. शरद पवार गटाचे ४४ आमदार असल्याचा दावा आहे. तर दुसरीकडे, अजित पवार गटाने दावा केला आहे की त्यांना ४९ आमदारांचा पाठिंबा आहे. आज या दाव्यांचे सत्य कळेल. आज बैठकींच्या निमित्ताने एक परेड आहे. या परेडमध्ये दोन्ही गटांची खरी ताकद कळणार आहे. याआधी अजित पवार यांनी आपल्या ९ आमदारांसह सरकार मध्ये सामील होऊन मंत्रिपदाची शपथ घेतलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा