राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद निवडणुकीची घोषणा करताच, तळेगाव दाभाडे शहरात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी इच्छुक दावेदारांमधील चुरस आता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षासह प्रमुख पक्षांमध्ये मोर्चेबांधणी, बैठका आणि रणनीती ठरवण्याचे सत्र सुरू आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींशी संपर्क वाढवून जोरदार फिल्डिंग लावली आहे.
पैठणीचा मोह की पायाभूत सुविधांची मागणी?
यंदा नगराध्यक्षपद सर्वसाधारण जागेसाठी खुले झाल्याने वरिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे, ज्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे, काही उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैठणी आणि साड्यांची उधळण केल्याची चर्चा आहे. मात्र, नागरिक आता जागरूक झाले असून, केवळ आश्वासनांपेक्षा त्यांना पायाभूत सुविधा आणि विकासकामांची हमी देणाऱ्या उमेदवारालाच पसंती देणार असल्याचे दिसून येते.
तिकीट वाटपात मोठी रस्सीखेच, बंडखोरीची शक्यता!
५० टक्के महिला आरक्षणाने सर्वच पक्ष सक्षम महिला उमेदवारांच्या शोधात आहेत. तिकीट वाटपात मोठी रस्सीखेच सुरू असून, पक्षांतर्गत डावपेच आणि कुरघोडींमुळे वातावरण तापले आहे. तिकीट न मिळाल्यास बंडखोरीचा धोकाही नाकारता येत नाही; काही इच्छुकांनी तर अन्य पक्षात प्रवेश करण्याची शक्यताही खुली ठेवली आहे. मागील निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले होते, पण यंदा जागा कमी आणि लढणारे जास्त अशी स्थिती असल्याने रणधुमाळी अधिक तीव्र होणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यावरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे
